जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. 13 वर्षांची मुलगी साडेसहा महिन्याची गरोदर असल्याची माहिती डॉक्टरांच्या तपासणीत उघड झाली.
चारकोप परिसरात राहणारी ही 13 वर्षांची मुलगी आहे. मुलीचं वजन वाढतंय या चिंतेत पालक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. पण डॉक्टर्सनी जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
सोनाग्राफी रिपोर्टमध्ये ही मुलगी साडेसहा महिन्यांची गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. या 13 वर्षांच्या मुलीला गर्भपातासाठी परवानगी द्यावी यासाठी पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
भारतात 20 आठवड्यांपर्यंतच गर्भपात करण्याची परवानगी आहे. आतापर्यंत मुंबईत 9 गर्भवतींनी गर्भपाताची परवानगी मागितली होती. पण त्यापैकी फक्त 7 प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं ही परवानगी दिली. त्यामुळे 13 वर्षांची आणि 26 आठवड्यांची गरोदर असलेल्या या अल्पवयीन मुलीबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं.