बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी १०. ३० वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी आणि कसा फोडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा गणिताचा पेपर कुणी फोडला ? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे ? यामागे रॅकेट सक्रिय आहे का ? याचा तपास केला जात आहे. मात्र, इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार नुकताच निस्तरल्यावर आता गणिताच्या पेपरचा नवा गोंधळ होण्याची चिन्हं आहेत. याबाबत बोर्डाच्या सूत्रांकडून अद्याप पेपर फुटल्याचा दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, १२वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवले जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील परभणीत बारावी इंग्रजीचा पेपर फुटला होता.
बारावीची परीक्षा सुरु आहे. मात्र, याआधी इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. हा गोंधळ कमी की काय? आणखी एक बातमी समोर आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. हा पेपर फुटल्याने परीक्षाबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यवतमाळ येथे इंग्रजीचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आले होते. हा गोंधळ असताना आता गणिताचा पेपर फुटल्याने प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्यांवर अन्याय का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे धक्कादायकबाब म्हणजे बारावी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.