अमरवाती, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांना पाकड्यांकडून धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने एक ध्वनीमुद्रीत संदेश अर्थात रेकॉर्डेड ऑडिओ मेसेज पाठवून धमकी दिली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि खासदार नवनीत राणा या सर्वांना ठार करू, ठार करण्यासाठी बॉम्बस्फोट करू अशा स्वरुपाची धमकी देण्यात आली आहे. धमकी देताना शिव्या देण्यात आल्या आहेत. आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. या धमकीची माहिती खासदार नवनीत राणा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिली आहे. धमकीची दखल घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोण आहेत नवनीत राणा ?
नवनीत राणा यांचे माहेरचे नाव नवनीत कौर. मुंबईत पंजाबी कुटुंबात त्यांचा ३ जानेवारी १९८६ रोजी जन्म झाला. वडील सैन्यात होते त्यामुळे कळत नकळत अंगी कडक शिस्त बाणवली गेली. उत्तम संस्कार झाले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर नवनीत यांनी मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. निवडक म्युझिक अल्बम केले. नंतर तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, हिंदी चित्रपटांमधून मनोरंजनसृष्टीत नशीब आजमावले.
नवनीत कौर योग आणि ध्यानधारणेसाठी उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे गेल्या होत्या. काही काळ योगगुरू रामदेव बाबा यांच्या आश्रमात राहिल्या होत्या. याच काळात राजकारणात सक्रीय असलेले रवी राणा रामदेव बाबा यांच्या आश्रमात योगसाधनेसाठी गेले होते. आश्रमातच रवी राणा आणि नवनीत यांची भेट झाली. ओळख वाढली. ओळखीचे रुपांतर हळू हळू प्रेमात झाले. पण घरून लग्नाला विरोध होत होता. वेगवेगळ्या वातावरणातील असल्यामुळे हा विरोध सुरू होता. पण विरोधाला झुगारून देत रवी राणा आणि नवनीत यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २ फेब्रुवारी २०११ रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले. या सोहळ्यात ३१६२ जोडप्यांनी लग्न केले.
आमदार रवी राणा आणि नवनीत यांच्या या लग्न सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव, सहारा प्रमुख सुब्रत रॉय आणि विवेक ओबेरॉय हे प्रमुख पाहुणे होते. लग्नानंतर राणा दाम्पत्याने रामदेव बाबांचा आशीर्वाद घेतला. राणा दाम्पत्याने सामूहिक लग्न करून मोठा खर्च टाळला आणि तो पैसा गरीबांच्या कल्याणासाठी राबवल्या जात असलेल्या योजनांकरिता दान केला. लग्नानंतर रवी राणा यांच्यासोबत नवनीत राणा पण सार्वजनिक जीवनात सक्रीय झाल्या. त्यांनी राजकारणात पदार्पण केले. सध्या रवी राणा अपक्ष आमदार आणि नवनीत राणा अपक्ष खासदार म्हणून महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातील जनतेसाठी काम करत आहेत. जनतेची सेवा करत असल्यामुळे राणा दाम्पत्य नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे.