यवतमाळ, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : वर्धा ते कळंब या रेल्वे गाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला आणि गाडीचे उद्घाटन केले. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तडस, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. वर्धा –यवतमाळ- नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग झाला आहे. या मार्गावरील वर्धा ते कळंब या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगीच वर्धा ते कळंब रेल्वेगाडी सुरू करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने गुरुवार २९ फेब्रुवारी २०२४ पासून वर्धा ते कळंब आणि कळंब ते वर्धा गाडी सुरू केली आहे. या गाड्या रविवार आणि बुधवार वगळता आठवड्यातून पाच दिवस चालतील, याशिवाय या गाड्यांना देवळी आणि भिडी स्थानकावर नियोजित थांबे असतील आणि मार्गावरील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतील. या रेल्वे सेवेचा लाभ प्रवासी, व्यवसाय आणि स्थानिक समुदायांना होईल, सुरळीत कनेक्टिव्हिटी सुलभ होईल आणि कळंब आणि वर्धा दरम्यान अखंड प्रवास शक्य होणार आहे.
अहमदनगर – बीड-परळी रेल्वे मार्गावर ६४५ कोटी रू. निधीतून न्यू आष्टी – अमळनेर टप्प्याचे व अमळनेर – न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. त्याचा लाभ बीड जिल्ह्यातील नागरिक व कामगार वर्गाला मिळेल. सुमारे ६७५ कोटी रू. निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा -कळंब या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ झाला. त्यामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील होईल. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू झाली आहे.