पुणे, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे रेल्वे स्थानक परिसरात कुठेही गॅस वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेचे उपाय करून इलेक्ट्रिक शेगडी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. गॅस गळतीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. स्थानक परिसरातील दुकानदार, उपहारगृह यांनी अन्न गरम करण्यासाठी, शिजविण्यासाठी एलपीजी गॅस वापरू नये, सुरक्षेचे उपाय करून इलेक्ट्रिक शेगडी वापरावी; असे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
रेल्वेच्या हद्दीत ज्वालाग्राही वस्तू, रसायने आणण्यास, वापरण्यास तसेच त्यांची वाहतूक करण्यास मनाई आहे. आग लागू नये यासाठीच हा नियम रेल्वे प्रशासनाने केला आहे. पण दुकानदार, उपहारगृह यांना अन्न गरम करण्यासाठी, शिजविण्यासाठी एलपीजी गॅस वापरण्याची परवानगी होती. आता रेल्वे प्रशासनाने एलपीजी गॅसवर बंदी घातली आहे. पण रेल्वे परिसरात दुकानदार, उपहारगृह यांना अन्न गरम करण्यासाठी, शिजविण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडी वापरण्याची परवानगी आहे. पुणे रेल्वे स्थानकावर ३२ स्टॉल्स आणि ५ उपहार गृहे आहेत. त्यांना रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपूवी पत्र पाठवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.