नांदेड, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीमुळे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याला तीन खासदारांची लॉटरी लागली आहे. नांदेडमधून भाजपाचे प्रताप चिखलीकर लोकसभेत खासदार आहेत. ते सक्रीय असतानाच भाजपाने राज्यसभेवर नांदेड जिल्ह्यातील दोघांना संधी दिली आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या सहा जागांपैकी तीन जागांसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. पुण्यातून मेधा कुलकर्णी तर नांदेडमधून अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नांदेडमध्ये भाजपाचे तीन खासदार होणार आहेत. यापैकी एक लोकसभेचा आणि दोन राज्यसभेचे असतील. याच कारणामुळे भाजपासाठी नांदेड जिल्हा एकदम सुरक्षित झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यातील इतर पक्षांकडे नांदेडसाठी एकही मोठा चेहरा उरलेला नाही. याचा फायदा भाजपाला लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत होऊ शकतो. महायुतीच्या जागा वाटपात ताज्या परिस्थितीचे कारण पुढे करत भाजपा नांदेडवर दावा करू शकेल आणि तीन खासदारांच्या जोरावर विजयाची हमी मिळवू शकेल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.