कोल्हापूर, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : आमदार फुटण्याचा धोका लक्षात घेऊन महाविकास आघाडीने कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. संभाजीराजे छत्रपती संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत. उमेदवारीच्या मुद्यावरून शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात वाद झाल्याचीही चर्चा आहे. या विषयावर कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्याकडून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र मागील काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. ते निवडक लोकांव्यतिरिक्त इतर कोणाशीही बोलणे टाळत आहेत. शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीने राज्यसभेची उमेदवारी दिली तर संभाजीराजे छत्रपती यांचे लोकसभेच्या निवडणुकीचे नियोजन बिघडण्याची चर्चा आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी ३ फेब्रुवारीचा त्यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा रद्द केला. कारण न देता त्यांनी दौरा रद्द केल्याचे ट्वीट केले. यानंतर स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजिलेल्या समारंभांना उपस्थित राहिलेले संभाजीराजे नंतर संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत. ते अद्याप संपर्क क्षेत्रात आलेले नाहीत.