मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : प्रदीप शर्माच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली आहे. पवईच्या प्रदीप शर्माच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी सुरू झाली आहे. एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही कारवाई सुरू आहे. अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा आरोपी आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेसह प्रदीप शर्मा आरोपी आहे. याच प्रकरणात काही काळ त्याने तुरुंगवास भोगला. पण सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्याला जामीन दिला.
प्रदीप शर्मा १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झाला. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट एन्काऊंटर आणि दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपावरून प्रदीप शर्माला २००८ मध्ये निलंबित करण्यात आले. लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्माला २०१३ मध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाने आरोपमुक्त केले. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातही प्रदीप शर्मा आरोपमुक्त झाला. सर्व आरोपांतून मुक्त झाल्यानंतर प्रदीप शर्माने महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली. लवादाचा निर्णय आला आणि प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत आला. पण २०१९ मध्ये त्याने राजीनामा दिला आणि निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. यानंतर अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या निमित्ताने प्रदीप शर्मा नव्याने चर्चेत आला.