मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बोरिवली – ठाणे भुयारी मार्गाच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील जागेची पाहणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत अधिकारी वर्गाने केली. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या टाटा पावर येथून या भुयारी मार्गाला सुरुवात होणार आहे. भुयारी मार्ग ज्या भागातून सुरू होणार आहे तिथल्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन केल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे. या झोपड्या म्हाडा, एसआरए तसेच खासगी जागेवर आहेत. यामुळे सर्व संबंधित सरकारी यंत्रणांशी चर्चा करून मार्ग काढू आणि पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन आमदार प्रकाश सुर्वे यांनी झोपडपट्टीधारकांना दिले.
बोरिवली ते ठाणे हे दीड तासाचे अंतर भुयारी मार्गामुळे वीस मिनिटांवर येणार आहे. यामुळे प्रवास सुखकर होण्यासोबतच इंधन बचत देखील होणार आहे. भुयारी प्रकल्पात १०.२५ किमीचा बोगदा आणि १.५५ किमीचा पोहचमार्ग असा १३.०५ मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे १२ किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. प्रत्येक ३०० मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक २ पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनेल बोरिंग मशिनच्या मदतीने करण्यात येणार आहे. प्रकल्पातील ४.४३ किमी लांबीचा रस्ता ठाणे जिल्ह्यातून तर ७.४ किमी लांबीचा रस्ता बोरिवलीतून प्रस्तावीत आहे.