चंद्रपूर, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर (२४) यांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली.
शिवा वझरकर हे रात्री साडेनऊच्या सुमारास अग्रवाल कोचिंग क्लासेसच्या जवळ उभे होते. अज्ञात आरोपींनी शिवा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवा वझरकर यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेनेचे सक्रीय शहरप्रमुख अशी शिवा वझरकर यांची ओळख होती. हत्येचे वृत्त पसरले आणि वझरकर यांच्या समर्थकांनी संशयितांच्या वाहनांची तोडफोड केली. यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. हत्या प्रकरणी तपास सुरू आहे.