अयोध्या, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : रामाची प्राणप्रतिष्ठा दुपारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी अयोध्या सजली आहे. सर्वत्र फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत. आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त संस्थेने सात हजार पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा तसेच प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. रामानंद सागर निर्मिती रामायण टीव्ही मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण या भूमिका साकारणारे कलाकार, प्रसिद्ध उद्योगपती, अनेक देशांचे प्रतिनिधी तसेच मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.