सातार, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : या देशातील पहिले वैज्ञानिक शेतकरीच होते. त्यांनी शेतीतून सोनं पिकवले. अन्नधान्याच्या वस्त्रांच्या समृद्धीकडे नेले. पण जेव्हापासून मोठ्या प्रमाणात रसायनांचा उपयोग शेतीमध्ये सुरू झाला. त्यातून काही काळ उत्पादकता वाढली असली तरी आज पुन्हा विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती उत्पादने ही काळाची गरज आहे. शेतीतील विज्ञान पुन्हा नव्याने मांडण्याची आवश्यकता आहे; असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कृषी आणि शेतकरी या दोहोंच्या प्रगतीसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. एक रुपयात शेतकरी पीक विमा योजनेचा लाभ आज लाखो शेतकऱ्यांना होत आहे. नमो शेतकरी सन्मान योजना, मागेल त्याला शेततळे, शेततळे अस्तरीकरण, मागेल त्याला ठिबक सिंचन अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत ते निकाली काढले आहेत. सिंचनाचे महाराष्ट्र आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातले सिंचनाचे प्रकल्प आपण मार्गी लावत आहोत. कृष्णा- कोयनेचे जलसिंचन प्रकल्पही मार्गी लावले आहेत. बंदिस्त जलनलिका पद्धतीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग म्हणून वर्षानुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या भागात यापुढे कोणत्याही प्रकाराचा दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही, असे सांगून उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलात बचत व्हावी, शेतकऱ्यांना फारशी आर्थिक झळ बसू नये, यासाठी त्या सौर उर्जावर चालविण्यात येणार आहे; असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सव २०२४ च्या सोहळ्यात बोलत होते.