नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात इंधन टँकर चालकांनी संप केला आहे. पेट्रोल भरण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असून राज्यभरातील पेट्रोल पंपवर गर्दी पाहायला मिळते आहे. पेट्रोल पंप चालकांनी संप पुकारल्यानंतर तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे लोकांनी पेट्रोल पंपवर गर्दी केली आहे.
शिर्डीत पेट्रोल पंपावर वाहनधारक त्रस्त
केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या मोटार वाहन धोरणाच्या विरोधात, इंधन वाहतूकदार चालक पुढील ३ दिवस संपावर जाणार असल्याने. इंधन वाहतूक पूर्णतः ठप्प होणार असून याचा थेट परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी ज्या ज्या पेट्रोल डिझेल पंपांवर इंधन शिल्लक आहे. त्याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली असून पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
येवल्यात पेट्रोल पंपावर गर्दी
केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली असून मनमाड येथील इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप पुकारत केंद्र शासनाने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. इंधन वाहतूक बंदचा आता येवल्यात देखील दिसून येत असून काही पेट्रोल पंपावर इंधन शिल्लक नसल्याने अक्षरशा ज्या ठिकाणी पेट्रोल शिल्लक आहे. त्या ठिकाणी नागरिक पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी केल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे.
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात ट्रक चालक आक्रमक
केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात पेट्रोल टँकर चालकांनी बंद पुकारला आहे. या बंदचा फटका वाहनधारकांना बसण्याची चिन्ह आहेत. अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या आहेत. बंदमध्ये पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे टँकरचालक देखील सहभागी झाल्याने पेट्रोल डिझेलचा तुटवडा होऊ या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी केल्याचे चित्र अकोला जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या धास्तीने लोकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे.
सांगलीत ट्रक चालकांचा केंद्र सरकारविरोधात संप
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायदा करण्यात आला आहे. यामध्ये यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विविध चालक मालक, वाहतूक संघटना विरोध दर्शविला आहे. नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे आज सायंकाळी पासून जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली आहे.
जळगावात वाहनचालकांच्या पेट्रोल पंपावर रांगा
हीट अँड रन कायदा विरोधात ट्रक चालक यांचा संप असल्याने पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.