अमरावती, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यादरम्यान अमरावती जिल्ह्यातील पतरवाडा नजीक वझ्झर येथे शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
पंढरपूरच्या कचराकुंडीत कुणीतरी टाकून दिलेला जीव तसेच नागपूरच्या बसस्थानकावर सापडलेल्या इवल्याशा श्वासांनाही शंकर बाबांनी आपलेसे करून जीव लावला. १०० पेक्षा अधिक मुलांचे बाबा म्हणून शंकर बाबांची ओळख आहे. सलमा शंकर बाबा पापळकर, विदूर शंकर बाबा पापळकर किंवा शिल्पा शंकर बाबा पापळकर ही तेथील मुलांची नावे आहेत. या सर्वांना घेऊन शंकर बाबा मतदानासाठी जातात तेव्हा ते दृष्य बघण्यासारखे असते. १८ वर्षांनंतर मुलींना अनाथालयात, निवासी आश्रमशाळेत ठेवण्यास सरकारी परवानगी नाही. आश्रमशाळेबाहेर पडलेल्या मुलींना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा कायदा दूर व्हावा यासाठी शंकरबाबा प्रयत्नात आहेत या विषयावर पवारांची त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.
वैराग्यमूर्ती असे व्यक्तिमत्त्व असलेल्या शंकर बाबांना भेटून आनंद झाला, असे पवार म्हणाले. जनसेवा करायला वयाची मर्यादा नसते हा निर्धार शंकर बाबांच्या कामातून व्यक्त होताना दिसला. एका सज्जन सेवकाची भेट घेतल्याचं समाधान लाभले, असेही त्यांनी सांगितले.
अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृह ही संस्था मागील अनेक वर्षांपासून अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. या संस्थेत १२५ हून अधिक बेवारस, दिव्यांग, गतीमंद तसेच अनाथ विद्यार्थ्यांचा सांभाळ केला जातो. या संस्थेमार्फत मागील १५ वर्षांत सुमारे ३० दिव्यांग, गतीमंद तसेच अनाथ मुलां-मुलींचे लग्न लावण्यात आले आहे.