मुंबई, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस इंफाळ नौदलात दाखल झाली. मुंबईत नौदलाच्या गोदीत झालेल्या कार्यक्रमात आयएनएस इंफाळ नौदलात दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
नौदलात विशाखापट्टण श्रेणीतील चार विनाशिका दाखल होणार आहेत. यापैकी आयएनएस इंफाळ ही तिसरी विनाशिका आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने या विनाशिकेची रचना केली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मुंबई यांनी ही विनाशिका तयार केली आहे.
भारतीय बनावाटीची आयएनएस इंफाळ म्हणजे आत्मनिर्भरतेकडे टाकलेले आणखी एक दमदार पाऊल असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ अर्थात समुद्रावर नियंत्रण मिळवतो तो सर्वशक्तिमान या नौदलाच्या तत्वाला ‘आयएनएस इंफाळ’ने आणखी बळ मिळवून दिले, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
‘आयएनएस इंफाळ’ या जहाजाची लांबी १६३ मीटर, रुंदी १७ मीटर आणि वजन १७०० टन आहे. या जहाजाला चार गॅस टर्बाईनद्वारे ऊर्जेचा पुरवठा होतो. ‘आयएनएस इंफाळ’ हे जहाज ३० सागरी मैलांपेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकते.
नौदलाच्या जहाजाला ईशान्येतील शहराचे नाव
पहिल्यांदाच भारतीय नौदलाच्या जहाजाला ईशान्येतील शहराचे नाव देण्यात आले आहे.