ठाणे, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ठाण्यातल्या प्रिया सिंह मारहाण प्रकरणातील आरोपी अश्वजित गायकवाड, रोमील पाटील, सागर शेळके यांना ठाणे न्यायालयाने जामीन दिला. ठाणे पोलिसांच्या एसआयटीने रविवारी रात्री उशिरा आरोपींना अटक केली. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. यानंतर आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. न्यायालयाने आरोपींना जामीन दिला.
आरोपींविरोधात कलम ३०७ आणि कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही. यामुळेच आरोपींना सहज जामीन मिळाला. आता आरोपींविरोधात कलम ३०७ आणि कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पीडितेच्या वकिलाने सांगितले.
सोशल मीडिया स्टार असलेल्या पीडितेने प्रसारमाध्यमांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. या माहितीनुसार, पीडितेला ११ डिसेंबर रोजी तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड याने ओवळा येथे भेटायला बोलवले होते. भेटी दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अश्वजितने तिला शिवीगाळ करून प्रचंड मारहाण केली. तिच्या हाताचाही चावा घेतला. गायकवाड याच्या रोमील पाटील आणि सागर शेळके या मित्रांनी पीडितेला गाडीने धडक दिली. या घटनेत पीडिता गंभीर जखमी झाली. सध्या पीडितेवर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलीस ज्या पद्धतीने काम करत ाहेत त्यावर सोशल मीडियातून अर्थात समाज माध्यमांतून टीका सुरू आहे.
पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली. या प्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान आणखी तथ्य समोर आल्यास गुन्हा नोंदीत आणखी काही कलमांचा समावेश होऊ शकतो, असे सिंह यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केले.