नाशिक, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर २०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे शाही स्नान होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४५ सदस्यीय शिखर समितीची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली. यासोबतच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय उच्चाधिकार समिती, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीही शासनाच्या नगरविकास विभागाकडून घोषणा झाली.
महापालिका आयुक्तांनी सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करत ११ हजार ११७ कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आराखड्यास मंजुरी व खर्चास मंजुरी देणे, नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सर्व विभागांत समन्वय ठेवणे अशा प्रकारची जबाबदारी असणार आहे.
सिंहस्थ ध्वजारोहण (प्रारंभ) : अश्विन वद्य षष्ठी, ३१ ऑक्टोबर २०२६
पहिले शाही स्नान : आषाढ कृष्ण अमावास्या, २ ऑगस्ट २०२७
दुसरे शाही स्नान : श्रावण वद्य अमावास्या, ३१ ऑगस्ट २०२७
तिसरे शाही स्नान : भाद्रपद शुद्ध द्वादशी, १२ सप्टेंबर २०२७
ध्वजावतरण, पर्वकाळ समाप्ती : २४ जुलै २०२८