नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेला २२ वर्ष ज्या दिवशी झाली त्याच दिवशी म्हणजे बुधवार १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत घुसखोरी झाली. दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट लोकसभेत उडी मारली तर तीन जणांनी संसद परिसरात गोंधळ घातला. सर्वांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या आणि स्मोक कँडल पेटवल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचा धूर निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. फरार असलेल्या पाचव्या आणि सहाव्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांना पाचव्या आणि सहाव्या व्यक्तींची नावं आणि त्यांची घरं याबाबतची माहिती मिळवली आहे. आतापर्यंत सहा नावं जाहीर झाली असली तरी या प्रकरणात पडद्यामागे आणखी काही जण असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे. दिल्ली पोलीस कसून तपास करत आहेत. घुसखोरी प्रकरणी संसदेच्या सुरक्षा विभागातील आठ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.
सागर, मनोरंजन, नीलम आणि अमोल या चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी
संसदेत घुसखोरी करण्यासाठी कट रचणारे सहा जण
१. सागर शर्मा : वय २७. लोकसभेत हुल्लडबाजी केल्याप्रकरणी अटक. जन्म दिल्लीत, पण लखनऊचा रहिवासी. बारावी उत्तीर्ण सागर आईवडील आणि बहिणीसोबत भाड्याच्या घरात वास्तव्यास होता. ई – रिक्षा चालवत होता. सागरचे वडील सुतारकाम करतात तर आई गृहिणी आहे. सागरच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये तो भगतसिंग आणि विदेशी क्रांतिकारक चे ग्वेरा यांचा उल्लेख करत असे.
२. मनोरंजन डी : वय ३४. लोकसभेत हुल्लडबाजी केल्याप्रकरणी अटक. कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवासी. दहा वर्षांपूर्वी बंगळुरू येथून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली. नोकरी न करता ‘भगतसिंग फॅन क्लब’ पेजच्या माध्यमातून इतर आरोपींच्या संपर्कात.
३. नीलम वर्मा : वय ३७. स्वतःला नीलम आझाद म्हणवून घेणे पसंत करते. हरियाणातील जींद जिल्ह्यातील गाशो खुर्द गावची रहिवासी. एमफिल केलेल्या नीलमने हरियाणा टीईटी उत्तीर्ण केली आहे. पण नोकरी करत नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन करून दिल्लीत प्रवेश करण्याचा मार्ग अडवला होता. या शेतकरी आंदोलनात नीलम सहभागी झाली होती. एका व्हायरल व्हिडीओत नीलम भाजपाला नाही तर काँग्रेस किंवा इंडियन नॅशनल लोकदलला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनात नीलम सहभागी झाली होती. नीलमच्या वडिलांचे मिठाईचे दुकान आहे. नीलमचे दोन भाऊ दुधाचा व्यवसाय करतात. नीलमला संसद परिसरात हुल्लडबाजी केल्याप्रकरणी अटक.
४. अमोल शिंदे : वय २५. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील झरी बुद्रुक गावचा रहिवासी. अमोलच्या गावाला थोरली झरी या नावानेही ओळखले जाते. अमोलला संसद परिसरात हुल्लडबाजी केल्याप्रकरणी अटक. अमोलचे वडील शेतमजूर. बारावी उत्तीर्ण झालेला अमोल स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात गुंतला होता, असे त्याचे वडील सांगतात.
५. ललित झा : बिहारचा ललित इन्टाग्राम प्रोफाईलमध्ये स्वतःची ओळख शिक्षक अशी करून देतो. तो एका स्वयंसेवी संस्थेचा सरचिटणीस असल्याचे काहीजण सांगतात. त्याच्या इन्स्टा पोस्ट हिंसेला चिथावणी देणाऱ्या आहेत. नीलम आणि अमोल संसद परिसरात हुल्लडबाजी करत असताना या हुल्लडबाजीचे चित्रिकरण करण्याचे काम ललित करत होता. सुरक्षा पथकांनी धरपकड सुरू करताच ललित फरार झाला. ललितचा शोध सुरू आहे.
६. विशाल शर्मा उर्फ विकी उर्फ जंगली : संसदेत गोंधळ घालण्याच्या कटाचा सूत्रधार. गुरुग्राममधील सेक्टर ७ हाऊसिंग बोर्ड कॉलनीत पत्नीसोबत राहतो. आधी एका निर्यात कंपनीच्या वाहनाचा चालक होता. आता रिक्षा चालक आहे. विशाल मद्यपी आहे. त्याचे पत्नीसोबत वारंवार भांडण होते. सागर तसेच इतर आरोपी अनेकदा विशालच्या घरी आले होते, असे विशालचे शेजारी सांगतात.
दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गंभीर आरोप ठेवत गुन्हे दाखल केले आहेत. कलम १२० ब अंतर्गत गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, १५३ अंतर्गत दंगलीला चिथावणी देणे, १८६ अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, ३५३ अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला करणे तसेच यूएपीएच्या कलम १६ आणि १८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.