पुणे, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: कॅडेटसचं दिमाखदार आणि शिस्तबद्ध संचलन… त्यानंतर कॅडेट्सनी केलेला जल्लोष व उपस्थितांकडून त्यांना मिळालेली दाद आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या अधिऱ्यांनी केलेला आनंदोत्सव… अशा उत्साहात पुण्यातल्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४५ वा दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला. या दीक्षांत संचलन सोहळ्याला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची यांची प्रमुख उपस्थिती होती.
डोळ्यात देशसेवेची स्वप्न घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण, येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे पेलण्याचा आत्मविश्वास, लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढायेजा, विजय भारत… सारे जहा से अच्छा या गाण्यांच्या तालावर शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४५ तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात कॅडेट्सनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानवंदना दिली.
पहाटेच्या रम्य वातावरण आणि गुलाबी थंडीत बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील ‘क्वाटर डेक’चा उघडलेला दरवाजा आणि या दरवाजातून विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बॅण्डचे झालेले आगमन, त्यापाठोपाठ प्रबोधिनीच्या छात्रांच्या मैदानावर झालेल्या प्रवेशामुळे या संचलन सोहळ्याला रंगत आली.