नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर सुनावणी झाली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जायकवाडीसाठी ८.६०३ इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी याला विरोध केला होता. तर, मराठवाड्यातील लोक प्रतिनिधी पाणी मिळावे यासाठी लढा देत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील कारखानदारांकडून करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेतील ३० ऑक्टोबरच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीला नकार दिला. यामुळे मराठवाड्यातील जनतेला दिलासा देणारा निर्णय घेत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.