पुणे, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ करणार होते. पण हा दौरा काही तास आधी रद्द झाला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी गाळप हंगामाला सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीला विरोध केला. यानंतर अजित पवारांनी दौरा रद्द केला. शेतकऱ्यांच्या हस्ते गाळप हंगामाचा शुभारंभ करावा, असे आवाहन करत अजित पवारांनी त्यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात बदल केला. कारखान्यात जाण्याऐवजी अजित पवार पुण्यातील निवासस्थानी गेले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पुण्यातील अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.