नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता गाभाऱ्यात प्रभू रामाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय, राम जन्मभूमी ट्रस्टच्या निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि उडुपीचे शंकराचार्य यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांना मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले. हे आमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी आनंदाने स्वीकारले. यानंतर आमंत्रण स्वीकारल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून दिली.
“जय सियाराम! आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. आत्ताच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी मला श्री राम मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू रामाची प्रतिष्ठापना याप्रसंगी मला अयोध्येला येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे आमंत्रण स्वीकारून खूप आनंद होत आहे. एका ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला या निमित्ताने लाभणार आहे; या शब्दात पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा आनंद ट्वीट करून व्यक्त केला.
सोमवार २२ जानेवारी २०२४
राम मंदिराचे उद्घाटन
प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
चार हजार संत महंत उपस्थित राहणार
अडीच हजार मान्यवर उपस्थित राहणार