नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : यंदाच्या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण कोजागिरी पौर्णिमेला आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आश्विन पौर्णिमेला म्हणजेच २८ आणि २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आहे. संपूर्ण भारतात खंडग्रास स्वरुपात हे ग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल आणि दोन वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात लागेल. चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त संपूर्ण आशिया खंडात तसेच ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिकेतील देश, दक्षिण पूर्व अमेरिकेतील देश, उत्तर अमेरिकेतील उत्तर पूर्व क्षेत्र, हिंद महासागर, दक्षिण प्रशांत महासागर येथून दिसणार आहे.
कोजागिरी पौर्णिमा : शनिवार २८ ऑक्टोबर २०२३
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. यंदा शनिवारी २८ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे. ही पौर्णिमा रविवारी २९ ऑक्टोबरला सकाळी १ वाजून ५३ मिनिटांनी संपेल. पण पौर्णिमेच्या चंद्रोदयाची वेळ आणि उदय तिथी दोन्ही २८ ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी येत असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमा २८ ऑक्टोबरलाच साजरी करण्यात येईल. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ ही २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेचा लक्ष्मी पूजेचा मुहूर्त
पहिला मुहूर्त : रात्री ८:५२ ते १०:२९ पर्यंत
दुसरा मुहूर्त : रात्री १०:२९ ते १२.०५ पर्यंत
तिसरा मुहूर्त : रात्री १२.०५ ते ०१.४१ पर्यंत