सांगली, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: सांगलीच्या विश्रामबाग येथील कल्पद्रुम क्रीडांगणाजवळ तब्बल साडेचार लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या साऱ्या नोटा बनावट असून संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. वाहिद रफिक पठाण, जमीर बागवान, संतोष हाताळे असे त्या संशयितांची नावे आहेत. सर्व नोटा ५०० च्या असून त्या कुठून आणल्या? कुठे तयार केल्या? पोलीस याची माहिती घेत आहेत.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी तिघेजण संशयास्पदरित्या आढळून आले. त्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले त्यावेळी झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडील सॅक मध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल सापडले. सखोल चौकशी केली असता त्या पाचशेच्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तब्बल ४ लाख ३८ हजार पाचशे रुपयांच्या नोटा बनवत असल्याचे दिसून आले. बनावट नोटांचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या रॅकेटबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.