मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हार्बर मार्गावर बेलापूर ते पनवेल दरम्यानचा ३८ तासांचा मेगाब्लॉक दुपारी एकच्या सुमारास संपणार होता. हा मेगाब्लॉक आणखी तीन तासांसाठी वाढवण्यात आला आहे. आता हा मेगाब्लॉक संध्याकाळी चार वाजता संपणार आहे. आधी ३८ तासांचा असलेला मेगाब्लॉक वाढीव कालावधीमुळे ४१ तासांचा झाला आहे. यामुळे प्रवाशांना आणखी काही तास त्रास सहन करावा लागणार आहे.
मालगाड्यांसाठी स्वतंत्र लोहमार्ग तयार करण्यासाठी बेलापूर ते पनवेल दरम्यान महिन्याभरापासून काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाचे काम सुरू असल्यामुळे दररोज रात्री उशिरा पनवेल पर्यंत जाणाऱ्या गाड्या बेलापूरपर्यंतच जात होत्या. या बदलामुळे बेलापूर – पनवेल पटट्यात राहणाऱ्या आणि रात्री उशिरा जाणाऱ्यांची गैरसोय होत होती. काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे ३८ तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला. हा ब्लॉक संपल्यावर रेल्वेच्या गोंधळातून सुटका होईल, असे वाटत होते. पण आता मेगाब्लॉक आणखी काही तास वाढवण्यात आला आहे. ब्लॉक काळातील काम संपले तरी पुढील पाच ते सहा दिवस दररोज रात्री साडेबारा ते सकाळी सकाळी ६ दरम्यान ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे.