संयुक्त राष्ट्रे, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारत या नावाचा उल्लेख झाला. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा उल्लेख केला. एस. जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधी या नात्याने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेपुढे भाषण केले. या भाषणाची सुरुवात एस. जयशंकर यांनी ‘नमस्ते फ्रॉम भारत’ अशी केली.
सर्व देशांची दहशतवादाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट असणे अपेक्षित आहे. राजकीय सोयीनुसार प्रत्येकवेळी दहशतवादाच्या मुद्यावर भूमिका बदलणे चुकीचे आहे, असे एस. जयशंकर म्हणाले. हे वक्तव्य करत नाव न घेता त्यांनी कॅनडाला फटकारले.
निवडक विकसित देशांच्या भल्यासाठी संपूर्ण जगावर विशिष्ट धोरण लादण्याचे प्रकार थांबवणे आवश्यक आहे. लसीकरणासारख्या जनहिताच्या कार्यक्रमात विकसित देशांना एक आणि इतर देशांना दुसरा न्याय हा प्रकार थांबवणे आवश्यक आहे. अन्न, ऊर्जा या विषयांत व्यापक जनहिताचा विचार करून काम करणे आवश्यक आहे, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले.