नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी कॅनडाशी संबंध असणाऱ्या ४३ दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी केला आहे. त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालमत्ता आणि संपत्तीबाबतची माहिती लोकांनी एनआयएला द्यावी, असं आवाहनही केलं आहे. एनआयएने जारी केलेल्या यादीतील काही गँगस्टर हे तुरुंगात आहेत तर काही फरार असून परदेशात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहे. या यादीमध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा समावेश होता.
गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एनआयए वेळोवेळी कारवाई करत असते. काही दिवसंपूर्वी भारतीय तुरुंगात बंद असलेल्या अनेक गुन्हेगारांचे तुरुंग बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर गँगवॉर, खंडणी व इतर गुन्ह्यांतील संघटित मालमत्ता जप्त करून चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आता तपास यंत्रणा ४३ गुन्हेगारांच्या मालमत्तेची माहिती गोळा करत आहे, जेणेकरून त्यांच्यावर पुढील कारवाई करता येईल. गँगस्टरच्या प्रॉपर्टी, काळेधंदे याविषयी कोणाकडे कोणतीही माहिती असल्यास त्याविषयी माहिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय तपास यंत्रणेने केले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून १२ गँगस्टरचे फोटो जारी करण्यात आले आहेत. यामध्ये गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, अर्शद्वीप सिंह गिल, लखबीर सिंह लांडा, दिनेश गांधी, नीरज पंडित, गुरपिंदर सिंह, सुखदूल सिंह, गौरव पटयाल, सौरव आणि दलेर सिंह यांचे फोटो देखील जारी केले आहे. पंजाब पोलिसांनी गोल्डी ब्रार आणि दल्ला यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केले आहे.