बुलढाणा, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून २ किमी अंतरावर असलेल्या कुंड या गावात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गावातील एका महिलेने त्याच गावातील सुमारे दहा लहान बालकांना जट्रोफा नावाच्या वनस्पतीची बिया शेंगदाण्यासारख्या लागतात म्हणून खाण्यास दिल्या. या जट्रोफाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा होऊन मुलांना मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यामुळे सर्व बालकांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. रुग्णालयातील बालरोग तज्ञांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.