अकोला, १६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २०१४ मध्ये राज्याच्या राजकारणात ठळकपणे आगमन झालं. त्यानंतरच राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला. ते अकोला इथे बोलत होते. फडणवीसांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा गंभीर आरोपही खडसेंनी केला.
मी गेल्या चाळीस वर्षांपासून राज्याचं राजकारण पाहतोय. मी आता सातव्यांदा आमदार झालो आहे. मात्र, राज्याचा राजकारणाचा स्तर २०१४-१५ पासून खाली गेला. २०१९ नंतर तर तो प्रचंड खाली गेल्याचे खडसे म्हणाले. आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे लोक मुख्यमंत्री होऊन गेलेत. त्यांनी कधी आपला संयम सोडला नाही. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणाची दिशा बदलली. एकमेकांचं सुड उगवणारं अशा स्वरुपाचं राजकारण सुरू झाल्याचं खडसे म्हणाले. मला विरोध करतो का तुला बघून घेऊ असं राजकारण सुरू झालं. यासाठी ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा शस्त्रांचा वापर राजकारणात केला जाऊ लागल्याचे खडसे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझाच हात आहे. २०१४ पुर्वी मीच विधानसभेत त्यांना माझ्या मागची जागा दिली. अनेक चर्चांमध्ये माझ्याऐवजी संधी दिली. अनेक प्रश्न त्यांनी त्यांच्या कौशल्याने उचलले. त्यानंतरच्या कालखंडात त्यांनी कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केल्याचे खडसे म्हणाले. मला मात्र, या गोष्टीचं दु:ख आहे की ज्या माणसाला प्रदेशाध्यक्ष करण्यात मोठी मदत केली, त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले. पुढे त्यांनीच व्यक्तीगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतल्याचे खडसे म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे चांगलं नाही असंही त्यांनी सांगितले.