मुंबई, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास लिअरजेट कंपनीचे खासगी विमान धावपट्टीवरून घसरले. घसरलेल्या विमानाने लगेच पेट घेतला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. विमानात सहा प्रवासी आणि दोन कर्मचारी अर्थात क्रू सदस्य होते. या सर्वांना विमानातून सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
अपघात झाला त्यावेळी दृश्यमानता ७०० मीटर होती. पावसामुळे धापवट्टीवर निसरडे झाले आणि विमान घसरले असे समजते. या प्रकरणी चौकशी होणार आहे.
घाटकोपर-कुर्ला दरम्यान असलेल्या मुख्य धावपट्टीवरून विमान घसरले. या अपघातानंतर मुंबईच्या विमानतळावरील विमानांची ये – जा बंद करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आल्यावर विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केली जाणार आहे. सध्या मुंबईच्या विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद आहेत.