मुंबई, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : येत्या गणेशोत्सवात आरे कॉलनीत मूर्ती विसर्जनाला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विशेष आर्थिक क्षेत्र समिती, वनविभाग आणि पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत. आरे कॉलनीत विसर्जनाची परवानगी मागणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी केलेल्या सुनावणीत फेटाळला. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नकोच, असे मत उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले.
शाडूची गणेशमूर्ती
गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला असताना गल्लोगल्ली गणेशमूर्तीच्या चित्रशाळांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. मात्र यंदाही शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाण फारसे वाढले नसल्याची प्रतिक्रिया मूर्तिकारांमधून उमटत आहे
नाशिकमध्ये गणेशोत्सवाची तयारी जोरात
लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. नाशकात गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. भालेकर मैदानावरील गणेश मंडळांचा देखावा नाशिककरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मैदानावर 7 ते 8 मंडळे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहेत.
डोंबिवलीत अगरबत्ती महोत्सव
यावर्षीच्या गणेशोत्सवात एचएससीकडून डोंबिवलीच्या आनंद बालभवनात भरवण्यात आलेल्या अगरबत्ती महोत्सवात पर्यावरण पूरक असा एक संदेश देण्यात आलेला आहे. या उत्सवात अडीच लाख अगरबत्तीने बनवलेला एक गणपती भक्तांसाठी सादर करण्यात आला.
विसर्जनस्थळी काम करणाऱ्यांना विम्याचे संरक्षण
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिहं चहल यांना पत्र पाठवले आहे. गणेशोत्सव काळात विसर्जनस्थळी कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना विमा कवच देण्याबाबत हे पत्र पाठवण्यात आलंय. या संदर्भात पालिका लवकरच निर्णय घेणार आहे.
सांगलीत ढोल – ताशा पथक
सांगलीमध्ये पहिल्यांदाचं भव्य ढोल – ताशा आणि झांज पथक स्पर्धा पार पडल्या आहेत.श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने शहरातल्या राजमती ग्राउंडवर या स्पर्धेचा आयोजन करण्यात आला होता.त्यामध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे वीसहून अधिक ढोल-ताशा पथकांनी सहभाग घेतला होता.झांज आणि ढोल ताशांच्या निनादाने संपुर्ण परिसर यावेळी दुमदुमून गेला होता.यामध्ये वाळवा तालुक्यातल्या बागणी येथील चाळके मामा झांज पथकाने पहिला क्रमांक पटकावला.