मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :
गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच पुणे, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेली नाही. पुण्यातील खडकवासला, पानशेत आणि मुळा-मुठा धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने पुणे शहरात उद्यापासून पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कालवा समितीची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात पाणीकपातीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही.
पुणे शहर व परिसराला पाणीपुवरठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत आणि मुळा-मुठा या धरणांमध्ये सध्या २७.६० अब्ज घनफूट इतका पाणीसाठा आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून सर्व धरणांमध्ये पाण्याची आवक होत नाहीय. आगामी काळात पावसाची शक्यता कमीच असल्याने पुणे शहरात पुन्हा एकदा पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेल्या दोन महिन्यात पुणे शहराला लागलेल्या पाण्याच्या साठ्यावर कालवा समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच पावसाळा संपेपर्यंत पाण्याचं नियोजन कसं करायचं?, यावरही सखोल चर्चा केली जाणार आहे. त्यामुळं आता उद्यापासून पुण्यात पुन्हा एकदा दर गुरुवारी पाणीपुरवठा कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे शहराला दरवर्षी १८.५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक झालेली नाही. उपलब्ध असेलल्या पाण्याच्या साठ्याचं प्रशासनाकडून योग्य नियोजन केलं जात आहे. त्यामुळं पुणेकरांना कमीत कमी पाण्यात गरज भागवावी लागणार आहे. पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाकडून पाण्याच्या नियोजनाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळं आता पुणे शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.