नाशिक, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अजित पवार गटाकडून नाशिक मधल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर ताबा मिळवण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सर्व बैठका खासगी ठिकाणी होत होत्या.
हे सर्व पाहता नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताई गटाकडून तात्पुरत्या स्वरूपात नवीन कार्यालय उभारण्यात आले आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका येथे एका खाजगी जागेत हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आले आहे. मुंबई नाका या ठिकाणीच राष्ट्रवादी काँग्रेसचे भव्य असे कार्यालय आहे. मात्र अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर नाशिक मध्ये देखील राष्ट्रवादीमध्ये फुट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
अखेर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा ताबा घेण्यात आल्याने ताई गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना कार्यालयात ‘नो एन्ट्री’ होती. त्यामुळे शरद पवार गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठका खाजगी ठिकाणी होत होत्या. मुख्य कार्यालयाचा ताबा अधिकृतपणे कुणाकडे राहणार, याचा निर्णय होईपर्यंत मूळ कार्यालयाच्या शेजारीच तात्पुरत्या स्वरूपात ताईत गटाकडून नवे कार्यालय उभारण्यात आले आहे.