कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. खर्गे म्हणाले, “मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विष माना किंवा मानू नका, पण त्याचा स्वाद घेतला तर नक्की मराल.” भाजपने खर्गेंच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.
या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता खर्गेंकडून स्पष्टीकरण आले आहे. खर्गे म्हणाले, “भाजपची विचारधारा ही फूट पाडणारी, शत्रुत्वाची, गरीब आणि दलितांबद्दल द्वेष करणारी आहे. मी फक्त या द्वेष आणि द्वेषाच्या राजकारणावर चर्चा केली. मी मोदीबद्दल हे बोललो नाही. मी वैयक्तिक विधाने केली नाहीत. मला असे म्हणायचे आहे की, त्यांची विचारधारा ही विषारी सापासारखी आहे.”
मल्लिकार्जून खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यात आला. भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.