अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी काँग्रेसच्या नगरपंचायतीच्या ९ मुसलमान नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस विरोध केला आहे. या विरोधामुळे कील नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत पुतळा उभारणीचा ठराव फेटाळला गेला. या ९ मुसलमान नगरसेवकांमध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहेत.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीवर सध्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. या नगरपंचायतीवर २०१८ मध्ये काँग्रेसचे महेफुज खान हे जनतेतून नगराध्यक्षपदी विजयी झाले होते. मात्र, बुधवारी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक चारवरून आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या सभेत शहरातील पंचायत समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचा ठराव फेटाळण्यात आला आहे. यासंदर्भात नऊ नगरसेवकांनी पुतळा उभारणीला विरोध करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. या नऊ नगरसेवकांमध्ये काँग्रेसच्या चार, वंचितचे तीन आणि दोन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.
बार्शीटाकळीतील नऊ नगरसेवकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केल्यानं भाजपनं बुधवारपासूनच समाज माध्यमांद्वारे याचा विरोध आणि निषेध केला. गुरूवारी तहसील कार्यालयावर मोर्चाचं आवाहन भाजपनं केलं. या आवाहनानंतर इतर पक्षही याविरोधात बार्शीटाकळीत रस्त्यावर उतरले. यात ठाकरे गट, शिंदे गट, मनसे आणि वंचितचे कार्यकर्ते मोर्चेत सहभागी झालेत. यासंदर्भात या नऊ नगरसेवकांवर कारवाईसाठीचं संयुक्त निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.