महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असला तरी या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना उष्माघात झाला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला ते म्हणाले की, ‘उष्माघातामुळे अनुयायांचा झालेला मृत्यू वेदनादायी आहे.’ मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकाढून ५ लाख रुपयांची मदत देखील जाहीर झाली आहे. खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही अनुयायांचा उष्माघातामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दुर्दैवाने त्यातील १३ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
१३ निरपराध श्री सेवकांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनावर तोफ डागताना कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी असायला पाहिजे, हे प्रशासनाला कळत नाही काय? असा संतप्त सवाल विचारला आहे. निष्पाप श्री सेवकांच्या नाहक मृत्यूसाठी सांस्कृतिक कार्य खाते जबाबदार असून याप्रकरणी प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
नागपुरातील वज्रमूठ सभा आटोपताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कामोठे येथील रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या श्री सेवकांची आस्थेने विचारपूस केली. सोशल मीडियावर या दुर्दैवी घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.