राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.’देशाला वाचवण्यासाठी आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी, संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी, तरुणांना नोकऱ्या आणि महागाई या मुद्द्यांवर एकत्र लढण्यासाठी आम्ही तयार झालो आहोत. आम्ही एक-एक करून सगळ्यांसोबत चर्चा करू. काल दोन पक्षांची भेट झाली होती, आज शरद पवार आले आहेत. एकत्र पुढे जायचा प्रयत्न करू’, असं पवार म्हणाल्याचं खर्गेंनी सांगितलं.
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर जाहीर केलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत नाराजी वाढली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते देखील नाराज होते. दरम्यान ही नाराजी दुरू झाल्याची चर्चा आहे. विरोधकांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सगळे पक्ष यासाठी कटिबद्ध आहेत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
‘खर्गेंनी सांगितले तेच आमचे विचार आहेत. पण नुसते विचार असून फायदा नाही, ही प्रक्रिया सुरू करणं गरजेचं आहे. ही सुरूवात आहे, यानंतर बाकीचे पक्ष या प्रक्रियेत येऊ शकतात. अजून ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चर्चा झाली नाही, पण तेही यात येऊ शकतात. सगळे एकत्र येणं गरजेचं आहे, त्यामुळे आमच्यातले काही जण हे काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील’, असं शरद पवार म्हणाले.