राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अवकाळीने मका, गहू, हरभरा, कापसाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजावर आभाळ कोसळलं आहे. दरम्यान कांद्याच्या घसरलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्याने माजी पालकमंत्री छगन भुजबळ सरकारवर चांगलेच कडाडले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मगरीचे नाहीत रक्ताचे आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की,”गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यशासन शेतकऱ्यांना विकासाचे गाजर दाखवत आहेत. शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना काढून त्यांना आश्वासनांचे गाजर दाखविले जात आहेत. मुळात गंभीर प्रश्न असा आहे की, त्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या का? शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मगरीचे नाहीत ते रक्ताचे अश्रु आहेत,” असे त्यांनी विरोधकांना धडसावून सांगितले.
“महाराष्ट्रात शेतकरी काय सामान्य माणूसही पिचला आहे. साडेअकराशे रूपयांवर सिलिंडर गेला आहे. शेतकऱ्याला कांदा रडवतोय, सामान्य माणसाला महागाई रडवते आहे आणि हे सरकार फक्त घोषणा करतं आहे. एसटी कामगारांना पगार देण्यासाठी यांच्याकडे निधी नाही आणि अर्ध्या तिकिटात महिलांना प्रवास ही घोषणा यांनी केली आहे. शेतकऱ्यांची तर या सरकारने थट्टाच केली आहे,” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.