आगामी मुंबई पालिका निवडणूकीच्या तोंडावर उद्धव गटाकडून शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर पक्षसंघटना वाढवण्याकरता संजय राऊत, सुषमा अंधारेंसह अनेकजण मैदानात उतरले आहेत. आता भाजपनेही लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली असून भाजपा-शिवसेना महायुतीकडून रविवारपासून मुंबईतील सहा जिल्ह्यांमध्ये आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजपा आणि शिवसेना यांच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी (ता. ५) मार्चपासून सुरू होत आहे. दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशा सहा यात्रा संपन्न होतील अशी माहिती भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजप-शिवसेनेकडून सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानापासून आशीर्वाद यात्रेची सायंकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे आणि रात्री नऊ वाजता मुंबादेवी येथे समारोप होणार आहे. तसेच ईशान्य मुंबई येथे शिवसेना भाजपा यांच्या वतीने आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात भव्य दिव्य बाईक रॅली देखील काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृतनगर घाटकोपर पश्चिम येथून आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत भाजपचे आशिष शेलार, मनोज कोटक, राम कदम हे मुख्य नेते उपस्थित असून हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते यावेळी आपल्याला पहायला मिळत आहेत.