संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामधील कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा दारूण पराभव केला आहे. भाजपाने पैशाचा पाऊस पाडला तरी, माझा विजय निश्चित असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी विश्वास व्यक्त केला होता. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे.
विशेष म्हणजे रासने यांच्या प्रचारासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, भाजप – शिंदे गटाचे आमदार, खासदार, केंद्रातील मंत्र्यांनी हजेरी लावली होती. मात्र तरीही हा पराभव झाल्याने मतदारांनी भाजपला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचारामध्ये पूर्ण ताकद लावली होती. काँग्रेसच्या नेत्यांसह, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही सभा तसेच रोड शो घेऊन धंगेकर यांचा प्रचार केला होता.
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यानिवडणूकीत सुरुवातीला भाजपकडून टिळक कुटुंबीयातूनच उमेदवारी जाहीर केली जाईल, असे वाटत होते. मात्र भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने येथील बहुसंख्य असलेला ब्राम्हण समाज नाराज असल्याचे सांगितले जात होते. आणि त्याची प्रचिती या निकालामध्ये दिसून येत आहे.