राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला बुधवार पासून सुरुवात होत आहे. सर्व विभागीय मंडळातून परीक्षा देणार्या विद्यार्थीसंख्येत यंदा मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६१ हजार ७०८ विद्यार्थीसंख्या कमी आहे. यंदा राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
सीबीएसई, आयसीएसई माध्यमाच्या शाळांकडे असणारा विद्यार्थ्यांचा कल आणि पालकांकडून एकच अपत्याचा घेतला जाणारा निर्णय यामुळे विद्यार्थीसंख्या घटल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक उपस्थित होत्या.
राज्य मंडळाच्या सर्व नऊ विभागीय मंडळाच्या वतीने २ ते २५ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होत आहे. यंदा १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी आणि ७ लाख ३३ हजार ६७ विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. तसेच ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ७३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण २३ हजार १० माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५ हजार ३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.