अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. या आरोपांना आता उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मविआ सरकारने तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना अटक करण्याचा कट रचला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटे बोलत आहेत. गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागले आहे.”
गुवाहाटीला जाऊन आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडाला रक्त लागल्याने ते खोट बोलत आहेत. महाविकास आघाडीसरकारची भूमिका होती, की कोणावरही राजकीय सुडाने कारवाया करायच्या नाहीत. हे आमच्या सरकारचं धोरण होतं, ते आम्ही राबवलं. विविध प्रकरणात गुंतवणून, प्रश्न विचारणाऱ्यांना, आवाज उठवणाऱ्यांना अटक करायची, त्यांना जामीन मिळवून द्यायचा नाही, केंद्रीय यंत्रणांचा वापर करायचा हे बेफामपणे सुरू आहे.
दिल्लीत, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंडमध्येही हेच सुरू आहे. निवडणुका जवळ येतील तसं हे वाढत जाईल. मनिष सिसोदिया हे दिल्लीची उपमुख्यमंत्री. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जगाला हेवा वाटावा असं काम केलंय. अबकारी खात्याच्या एका धोरणात्मक निर्णयासंदर्भात त्यांना अटक केलीय. हे निर्णय कॅबिनेटमधील असतात मंत्र्यांचे नसतात. आतापर्यंत मंत्र्यांना अटक झाली, ते निर्णय कॅबिनेटचे आहेत.