मुंबई महानगर पालिकेच्या वतीने मुंबई शहराच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार असून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांव्दारे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भाजप व शिंदे गटाने मुंबईत विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाकाच लावला आहे. आज एकाच दिवशी मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत ३२० कामांचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महानगर पालिकेच्या वतीने मुंबई शहराच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुंबईच्या विकासाला गती देणार असून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. मुंबईला स्वच्छ सुंदर आणि निरोगी करायची आहे. त्यासाठी समुद्र किनारे, सार्वजनिक जागा आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईतील नागरिकांचे दैनंदिन जीवनात सुधारणा होईल. मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. ज्यामुळे मुंबईतील नागरिकांचे दैनंदिन जीवनमान उंचावले जाईल.’
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना दिली. म्हाडा, उपकर प्राप्त इमारती, एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करणार असून येत्या दोन वर्षांत एकही खड्डा दिसणार नाही, असे काम करणार आहोत.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुंबईतील नागरी समस्या दूर करण्यासाठी सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत अनेक कामे केली जाणार आहेत. मुंबई महापालिकेकडे असलेला निधी नागरिकांच्या समस्यांवर उपाय काढण्यासाठी खर्च केला जात आहे.’