स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुधवारी राज्यभर आंदोलन आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात यते आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्यभर जिह्यांत विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
सध्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यक तेवढी वीज उपलब्ध करून दिली जात नाही, तसेच शेतकऱ्यांच्या वीजबिलात 37 टक्के वाढ केली आहे. मुळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना वीज वितरण विभाग आणि महापारेषण याच्या वतीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव देखील मिळत नाही.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग तसेच रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या निधी कवडीमोल किंमतीने शासनाकडून संपादित केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा असा या आंदोलनाचा हेतू आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व अडचणी संदर्भात बुधवारी होत असलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असेही आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यानी सांगितले जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यानी केले आहे.