महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप-शिंदे गटाने देशात नेत्यांपासून पदाधिकाऱ्यांना विकत घेण्यासाठी ‘रेट कार्ड’ तयार केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांसाठी 50 कोटी तर खासदाराला विकत घेण्यासाठी 75 कोटींचे रेट कार्ड असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात कलगीतूरा सुरू असताना संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
या घोडेबाजारासाठी तब्बल २००० कोटींचा व्यवहार झाल्याचे राऊत म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी आता ठाकरे गटातील नगरसेवक, आमदार, खासदार, शाखाप्रमुख यांना सत्ताधाऱ्यांच्या गोटात खेचण्यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आल्याचा नवीन आरोप केला आहे. यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “ निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आणि ‘मेरी मर्जी’ वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला निर्णय आहे. दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता या सर्वाचा वापर करून त्यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्य-बाण चिन्ह मिळवलं आहे. गेल्या पाच महिन्यांत दोन हजार कोटींचं पॅकेज खर्च करण्यात आले. ‘ आपण जो आरोप ” केला आहे त्याच्या परिणामांची पूर्ण कल्पना असल्याचे” यावेळी संजय राऊत म्हणाले.