पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर बुधवारी या चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी कॉँग्रेससह खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला. मोदींच्या या टीकेलाच आता कॉँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर टीका केली आहे. प्रधान मोदींचं संसदेतील भाषण हे महापालिकेच्या स्थरावरचं होतं, असं ते म्हणाले.
“राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा महत्त्वाची असते. सरकारचा कार्यक्रम राष्ट्रपती मांडतात आणि त्यावर ही चर्चा होते. यावर विरोधी पक्षासह सत्ताधारी नेते बोलतात आणि शेवटी या सर्व चर्चेला पंतप्रधान उत्तर देतात. पण, काल मोदींनी या चर्चेला बगल दिली. राहुल गांधींसह इतर विरोधी पक्षांकडून अतिशय महत्त्वाचे प्रश्न करण्यात आले होते. मात्र, मोदींनी काही तरी टिंगल करत अगदी महापालिकेच्या स्तरावरचं भाषण केलं.ही आमची अपेक्षा नव्हती,”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
अदाणी प्रकरणामुळे भांडवली बाजार कोसळला आहे. तसेच एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्सही खाली आले आहेत. हे प्रकरण शांत करण्यासाठी पंतप्रधान मोदी या विषयावर बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मोदींनी सर्वच विषयला बगल दिली. यावरून हे सर्व आरोप खरे आहेत, हे गृहीत धरावं लागेल. पंतप्रधानांनी बालिश उत्तरं न देता, केवळ वेळ काढून नेली, असेही ते म्हणाले.