ठाणे-मुंबई शहरांना जोडणाऱ्या कोपरी पूलाची कामे पूर्ण झाल्यामुळे हा पुल उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी रोजी या पुलाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA अंतर्गत तयार झालेल्या या पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज उदघाटन होणार आहे.
ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाचे काम आता पूर्ण झाले असून ९ फेब्रुवारी रोजी या पुलाच्या उर्वरित दोन मार्गिका नागरिकांसाठी खुल्या करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु होते. जुना पूल निकामी झाल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर मधला जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन दोन मार्गिका उभारण्यात आल्या.
या पुलामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक, कल्याण -डोंबिवली या ठिकाणावरून सकाळी आणि संध्याकाळी चाकरमानी आणि प्रवाशी मोठ्या प्रमाणात या कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मात्र अपुऱ्या पुलामुळे या पुलाजवळ आणि टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र या पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रवाश्यांना आता दिलासा मिळणार आहे.