कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले.
मात्र, असं असलं तरी कसब्याच्या निवडणुकीत नवे चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युती केली होती. संभाजी ब्रिगेडपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीही कसब्यासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.