कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपकडून केलं गेलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आता यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.
राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ज्यात त्यांनी राजकीय संस्कृती, कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक या गोष्टींचा उल्लेख केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण करुन राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. आता कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठीही राज ठाकरे पुढे आले आहेत. राज ठाकरे यांनी यासाठी पत्रक जारी केलं आहे. ‘मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.’ असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे.