शिवसेनेतील बंडानंतर राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले एक म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट त्यावर आता भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठं विधान केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, शिवसेनेचे दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं. महत्त्वाची बाब म्हणजे, या सभेला मंत्री गिरीश महाजनांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा भाजपचाच डाव असल्याची कबुली गिरीश महाजन यांनी दिली. या सर्व गोष्टी जमून आल्या. घडून आल्या. यासाठी चांमुंडा मातेचा आशीर्वाद आमच्यापाठी होता. हे सोप्प नव्हतं. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते. हे सोप्पं आहे का एवढं? 40 लोकं उद्धवजींना कंटाळून बाहेर पडताहेत हे सोपं नव्हतं, असं महाजन यांनी सांगितलं.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलंच. बुडायला लागलो तर समुद्राची लाट येते आणि ढकलून देते. अशीच लाट आली. ही लाट साधीसुधी नव्हती. तर लाट आली अन् थेट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच बसवून दिलं. आणि ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले, असं गिरीश महाजन म्हणाले.